*माणसाला सकारात्मक आयुष्य जगायला शिकवण्याची ताकद खेळ व योगामध्ये - प्रा. सौ. लीना पाटील*
मिरज: दि.१७ फेब्रवारी,मानवी शरीरात विविध क्रियांचे पद्धतशीर जैविक चक्र असून त्यामध्ये बिघाड झाल्यास शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होतात. खेळ व योगासने आपणास शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत करतात व माणसाला सकारात्मक आयुष्य जगायला शिकवतात असे विचार श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. सौ. लीना पाटील यांनी मांडले. मिरजेतील कन्या महाविद्यालयाने अग्रणी महाविद्यालय समुहाअंतर्गत आयोजित केलेल्या "खेळ आणि योग" या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत त्या उदघाटक व बीजभाषक म्हणून बोलत होत्या. आपल्या बिजभाषणात त्यांनी, विद्यार्थी व खेळाडूंना खचून न जाता धाडसी मनोवृत्तीने आलेल्या संकटाला तोंड देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके होते.
प्रथम सत्रात एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाडचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. सुनील चव्हाण यांचे तज्ञ मार्गदर्शन झाले. त्यांनी मार्केटिंगच्या जगात सर्व काही मिळेल पण हे शरीर पुन्हा मिळणार नाही आणि त्यासाठी पुरेसे खेळ व योगासनांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. दूसऱ्या सत्रात 'क्रीडा विषयक जागृती व विकास' या विषयावर दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी चे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आकाश बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी खेळामधील विविध करिअरच्या संधी आणि त्यासाठी काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती दिली. सर्वगुणसंपन्न खेळाडू होण्यासाठी फक्त दिसण्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कर्तृत्वातून काय आहोत हे दाखवून दिले पाहिजे असेही प्रा.आकाश बनसोडे सर म्हणाले.
सदर कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. सौ. मंजिरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. गंगाधर चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा.विनायक वनमोरे, श्री. राजकुमार बोमाण्णा, महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks you