खेळ हे शिक्षणाचं अतिशय प्रभावी माध्यम असल्याचं आता पाश्चिमात्य जगात मान्य झालेलं आहे. मुलं शारीरिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकाराच्या खेळात भाग घेतात. शारीरिक खेळांमुळे (उड्या मारणे, धावणे) शारीरिक हालचाल भरपूर होते, श्वासातून एरवीपेक्षा अधिक प्राणवायू शरीरात जातो आणि त्याचा फायदा लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी होतो. शारीरिक खेळांमुळे हाडापेरांची वाढ चांगली होते, शिवाय त्यांच्यात दणकटपणा येतो, इतकंच नाहीतर विशेष कौशल्याची जिथे गरज असते अशा कामांसाठी शरीर लवचीक होण्यासाठीही शारीरिक खेळ आवश्यक ठरतात. शारीरिक कौशल्यं आणि क्षमता भरपूर असलेल्या मुलांमधे एक आत्मविश्वास असतो, नव्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची धमक असते.
इतरांसोबत खेळल्यानं अनेकांबरोबर बोलण्याचा, वागण्याचा अनुभव बालकांना मिळत असतो. अशा अनुभवातून एकमेकांना समजावून घेणं, त्यांचे प्रश्न, भावना यात सामील होणं, अनुभवांची देवाणघेवाण करणं अशा अनेक गोष्टी मुलं शिकतात. भाषा व्यवहाराच्या विकासातही खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. एकमेकांशी संवाद करायला, खेळायला जराही जागा न देणार्याक शिक्षण व्यवस्थेत ह्या शिक्षणाची संधी मुलांना मिळत नाही, त्यांना फक्त शिक्षकाच्या सूचना-आदेशांचीच भाषा ऐकावी लागते. इतर मुलामुलींसोबत मुक्तपणे संवादाची संधी मुलांना जेव्हा मिळते तेव्हा ते भाषेचा वापर अनेक कारणांसाठी करतात; उदा. माहिती देणं आणि मिळवणं, प्रश्न विचारणं, एखाद्या वस्तूचं किंवा प्रसंगाचं वर्णन करणं, अनुभवांची देवाणघेवाण करणं, विनंती करणं, चर्चा करणं, वाद घालणं, इत्यादी. ह्याप्रकारे होणारा भाषेचा वापर हा मुलांच्या स्वत:च्या अनुभवाशी जोडलेला असल्याने त्यांच्या दृष्टीनं तो अत्यंत अर्थपूर्ण असतो.
काल्पनिक प्रसंगाचे खेळ खेळणं ही तर बालविकासातली एक महत्त्वाची पायरी आहे. दोन किंवा जास्त मुलं एकत्र येऊन असे खेळ खेळत असतात तेव्हा ते एकमेकांशी बोलत-वागत असतात, काल्पनिक प्रसंग-परिस्थिती रचून जीवनानुभव घेत असतात. हे प्रसंग त्यांनी प्रत्यक्षात, दूरचित्रवाणीवर बघितलेले तरी असतात, किंवा पुस्तकात वाचलेले असतात. शाळा-शाळा, घर-घर अशा प्रकारच्या खेळात वेगवेगळ्या भूमिका घेणं, नातेसंबंधांची जाणीव ठेवणं आणि त्यानुसार एकमेकांशी वागणं ह्याचा अनुभव मुलांना येतो. समजा एखादं मूल शिक्षक, दुसरं विद्यार्थी आणि आणखी कुणी पालक झालेलं आहे, तर अशा वेळी प्रौढाची कुठलीही मदत नसतानाही भाषेचा वापर करताना, मुलं आपल्या एरवी असलेल्या क्षमतेहून वरचढ दर्जाच्या भाषेचा वापर करताना दिसतात. यामधे खूप मोठ्या प्रमाणात अमूर्त कल्पना तसंच समस्या निवारण संकल्पनांचा भाग असतो. याचं कारण मुलं त्यात प्रत्यक्ष जीवनानुभवाचाच वापर करतात आणि त्यात आपल्या कल्पनांचाही अंश मिसळतात.
लहान वयातील मुलांच्या भावनिक विकासासाठी अशा खेळाचं फार मोठं महत्त्व आहे. काही अभ्यासांमधे अशा प्रकारच्या खेळांचं आणि नंतरच्या आयुष्यातील वाचन आणि लेखन या क्रियांमधील विकासाचं थेट नातं असल्याचं नोंदवलेलं आहे. वंचित आणि सामाजिक - आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घरातल्या मुलांना अशा खेळांसाठी आवर्जून प्रवृत्त करावं लागतं, तसं करता आल्यास त्याचा त्यांच्या वाचन लेखन शिकण्यात मोठाच फायदा जाणवतो.
सिगमन्ड फ्रॉइड हे एक महत्त्वाचे मानले गेलेले जर्मन मानसशास्त्री एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. त्यांनी मनोविश्लेषणाची पद्धत शोधून काढली आणि मानवी मन समजावून घेण्यासाठी ती वापरली. फ्रॉईडनी लहान मुलांच्या काल्पनिक खेळांवर थेट काम केलेलं नसलं तरी लहान मुलाच्या मनाच्या आरोग्यासाठी त्याची गरज असल्याचं त्यानं नोंदवलेलं आहे. खेळताना मुलांची मनं मोकळी असतात, त्यावर कुठलंही दडपण नसतं. जीवनातल्या त्रासदायक भावनांचा (उदा. राग, भीती, दु:ख) सामना करण्यासाठी अशा मोकळ्या मनाच्या अनुभवाची त्यांना गरज असते. आईवडिलांचा राग, कुटुंबातल्या कुणाचा तरी मृत्यू, परीक्षेची किंवा डॉक्टरांकडे जाण्याची भीती यांसारखे प्रसंग मुलांच्या आयुष्यात येत असतात, त्यांना त्याचा सामनाही करावा लागणार असतो. अशा त्रासदायक भावनांचा सामना करण्यासाठी मुलं कधीकधी एक वेगळी युक्ती करू शकतात. त्यांना भीती वाटणार्या प्रसंगाचा प्रयोग ते आपल्या बाहुलीवर किंवा इतर खेळण्यावर, वस्तूंवर करतात. अनेक संशोधकांनी अशा काल्पनिक खेळाचं बालकाच्या भावनिक स्वास्थ्यातलं महत्त्व नोंदवलेलं आहे.
खेळ हा बालकाच्या शारीरिक, मानसिक, भाषिक आणि संबोधविषयक विकासातला एक महत्त्वाचा घटक आहे हे आता सर्वांनीच मान्य केलेलं आहे.
No comments:
Post a Comment
Thanks you