कन्या महाविदयालयाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
मिरज : समाजाचा विकास हेच शैक्षणिक विकासाचे अंतिम ध्येय आहे, त्यामध्ये स्त्रीचा वाटा अत्यंत मोलाचा असून कन्या महाविद्यालयाने गेल्या 35 वर्षात स्त्री शिक्षणाला दिलेली गती वाखाणन्याजोगी आहे असे गौरवोदगार जेष्ठ समाजसेविका मा. मंदाताई मराठे यांनी काढले.
येथील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी व बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. सुधारित विद्यापीठ कायद्याअन्वये शिवाजी विद्यापीठाच्या निर्देशानुसार कन्या महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिला पदवी प्रदान सोहळा शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कारंडे, दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शिवपुत्र गाडवे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंदरावजी मराठे या मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके होते.
मा. मंदाताई मराठे आपल्या बीजभाषणात पुढे म्हणाल्या की, शिक्षण, व्यवसाय संधी, नागरिकांची कर्तव्ये, स्त्रीविषयक कायदे आणि अर्थसाक्षरता या सर्व बाबी अविरत शिक्षणाचाच एक भाग असून या सर्व गोष्टींच्या आधारे विद्यार्थिनींनी विशाल कार्यक्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. व्यक्तीची योग्यता लिंगावर ठरत नसून ती कर्तृत्वावर ठरत असते. महाविद्यालयाने दिलेली संस्काराची शिदोरी वापरून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविण्याचा मौलिक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य राजू झाडबुके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्नातकानी मिळवलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना उज्वल भवितव्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. समारंभाच्या प्रारंभी पटवर्धन हॉल येथून ग्रंथदिंडी व मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख म्हणून डॉ. सागर लटके यांनी शिवाजी विद्यापीठाचा ध्वज तर महाविद्यालयात सर्वप्रथम आलेली बी. कॉम. च्या कु. मयुरी अरुण सुतार या विद्यार्थिनीस मिरवणुकीमध्ये महाविद्यालयाचा ध्वज घेण्याचा बहुमान मिळाला. यावेळी कला व वाणिज्य शाखेच्या एकूण 84 स्नातकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मराठे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. समीर गोखले, सचिव श्री. सुधीर गोरे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक व सर्व प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाविद्यालयीन परीक्षा प्रमुख डॉ. सागर लटके यांनी मान्यवरांचे स्वागत व समारंभाचे प्रास्ताविक केले. आभार प्रा. एम. जी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सौ. शर्वरी कुलकर्णी व प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले.
सोहळ्याची काही क्षणचित्रे
No comments:
Post a Comment
Thanks you