Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Monday, February 4, 2019

*हिमोग्लोबिन*

हिमोग्लोबिन
रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे. सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरविणे आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिन हे १३.५ ते १७ gms/dL, तर स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन १२ ते १५ gms/dL एवढं हवं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अॅनिमिया म्हणतात (यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही म्हटलं जातं). अॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुली, तरुण मुली, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये याचं प्रमाण खूप आहे. लोहयुक्त पदार्थांची आहारातील कमतरता हे अॅनिमियाचं महत्त्वाचं कारण आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण घटतंय. अॅनिमियाचं दुसरं कारण म्हणजे आहारातून मिळणाऱ्या लोहाचं रक्तातील शोषण रोखणाऱ्या काही घटकांचं सेवन आपल्याकडून कायम केलं जाते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेऊनही त्याचं योग्य प्रमाणात शोषण न झाल्यानंही अॅनिमिया होतो. इतर कारणं म्हणजे अति रक्तस्त्राव, आतड्याचे रोग, इन्फेक्शन, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, बी १२ ची कमतरता, लिव्हरचे काही आजार, किडनीचे काही ठराविक आजार, गरोदरपणात होणारी लोहाची कमतरता अशी बरीच कारणं आहेत. थकवा येणं, अंधारी येणं, कामात लक्ष न लागणं, हातापायातील त्राण कमी झाल्यासारखं वाटणं ही अॅनिमियाची काही मुख्य लक्षणं आहेत. हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोहाच्या गोळ्या सुरू करणं हाच योग्य उपाय आहे. परिस्थिती खालावली, तर शरीराला जास्तीचं रक्तही पुरवावं लागू शकते. बऱ्याचदा रक्तातील लोहाची पातळी अतिरिक्त कमी होईपर्यंत ही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा.
*हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार*
बीट, टोमॅटो, गाजर आणि अशा लाल रंगाच्या पदार्थांमधून लोह मिळतं किंवा त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हा निव्वळ गैरसमज आहे. चिकन, अंडी, मासे, इतर मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, उसळी, सुका मेवा, हळीव, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळतं. अन्नावाटे मिळणाऱ्या लोहाचेही दोन प्रकार आहेत. हिम आणि नॉन हिम. हिम प्रकारचे लोह सर्व प्राणिज स्रोतांमधून मिळतं, ज्याचे रक्तातील शोषण सहज होऊ शकतं. नॉन हिम प्रकारचे लोह सर्व वनस्पती स्रोतांमधून मिळतं, ज्याचं शोषण सहजासहजी होत नाही. याचाच परिणाम म्हणजे मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण जास्त आढळतं; कारण शाकाहारातून मिळणाऱ्या लोहाचं शोषण बऱ्याचदा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांना आहारातील लोहाचं शोषण व्हावं यासाठी लोहयुक्त पदार्थ खाताना व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे रक्तातील नॉन हिम प्रकारच्या लोहाचं शोषण होण्यास मदत होते. अन्नावाटे मिळणारे फायटेट आणि टॅनिनयुक्त पदार्थ, कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, अँटासिड्सचे अतिरेकी प्रमाणात सेवन, चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातील लोहाचं शोषण होऊ देत नाहीत. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करत असताना त्याचवेळी वर दिलेल्या या पदार्थांचं सेवन करणं जाणीवपूर्वक टाळलं, तर तुम्ही खाल्लेल्या लोहाचं शोषण योग्य प्रमाणात होऊ शकतं.


संदर्भ.इंटरनेट

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...