जागतिक हृदय दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात रक्त तपासणी शिबीराचे आयोजन
![]() |
रक्त तपासणी करताना उपस्थित विद्यार्थिनी Activity Report |
मानसशास्त्र आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचा अनोखा उपक्रम
मिरज: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ताणतणाव, आहारातील बदल, व्यायामाचा अभाव अश्या विविध कारणामुळे शारीरिक अनारोग्य वाढत आहे. दिवसेंदिवस हृदयविकार हा सर्वसामान्य होत चालला आहे. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस, या दिवसाचे औचित्य साधून दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयातील मानसशास्त्र आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व प्राध्यापकांसाठी संपूर्ण रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थिनींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही तपासणी मिरजेतील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ७ च्या सहकार्याने करण्यात आली. प्रारंभी या शिबिराचे तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने 'हृदय:दिल है की मानता नही' या विषयावर सादर केलेल्या सुकन्या भित्तीपत्रकाचे उदघाटन आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये 86 विद्यार्थिनींच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी, हिमोग्लोबिन अश्या एकूण 17 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. सुमारे 25 मुलींना टिटी चे इंजेक्शन देण्यात आले. प्राध्यापकांनी देखील यावेळी रक्त तपासणी करून घेवून टिटी चे इंजेक्शन घेतले.
विद्यार्थिनींशी संवाद साधताना डॉ. धनवडे यांनी, शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही जणांना दम लागणे, कमजोरी वाटणे, थकवा जाणवणे अशा विविध समस्या जाणवतात. यावर मात करण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असून आहारामध्ये गूळ, शेंगदाणे, मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, गाजर, बिट, काकडी, मीठ, लसूण, फळे अश्या फॉलिक आम्ल, लोह, प्रथिने पुरविणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. फास्टफूड, जंकफूड, धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहावे असे मौलिक मार्गदर्शन केले. रक्त तपासणी करणेकामी आरोग्य केंद्राने केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी डॉ. शीतल धनवडे, राजश्री होळकर, अनुराधा देसाई, सोनाली कांबळे, सुवर्णा खंडागळे या सर्वांचे पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी यांच्याहस्ते सत्कार करणेत आला.
या शिबिराचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालक श्री. बाबासाहेब सरगर, सौ. मृदुला कुलकर्णी, प्रा. एम. जी. पाटील, प्रा. विनायक वनमोरे, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा. भानुदास पवार, प्रा. तुषार पाटील यांनी केले. शिबिराच्या आयोजनासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
P NEWS
No comments:
Post a Comment
Thanks you