![]() |
भारदस्त व्यक्तिमत्व, रुबाबदार सैनिकी गणवेश, खडा व भेदक आवाज आणि आपल्या वरिष्ठाला व तिरंग्याला सल्युट करण्याची एक विशेष आणि रुबाबदार पद्धत. तुम्ही मी आपण सर्वांनी हे सगळं पाहिलयं, कुणी प्रत्यक्ष पाहिलय तर कुणी टीव्ही व सिनेमात पाहिलय.
26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथवर जेव्हा सैन्य संचलन होत असतं तेंव्हा एक बाब सामायिक असते ती म्हणजे सल्युट किंवा सलामी मग ते भुदल असो नौदल असो किंवा वायुदल. वरकरणी तुम्हाला तिन्ही सैन्यदले म्हणजे आर्मी, नेव्ही व एयर फोर्स म्हणजेच भुसेना, जल सेना व वायुसेना या तिन्ही दलातील सैनिकांची सलामी (सॅल्यूट) एकसारखे दिसत असेल म्हणजे त्यांची सलामी देण्याची पद्धत सारखीच आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण तसं अजिबात नाहीये. भारतीय सैन्याच्या सलामी देण्याचा पद्धतीमध्ये व रॉयल ब्रिटिश आर्मी व नेव्हीच्या सलामी देण्याचा पद्धतीमध्ये काही प्रमाणात साम्य आढळते. असे म्हटले जाते की सैन्याची सलामी देण्याची पद्धत रोमन काळातील असून, काळानुसार त्यात बदल होत गेले. त्या काळी सैनिक आपल्या वरिष्ठ अधिकार्यास सलामी देताना आपल्या डोक्यावरील टोपी हातात घेवून व किंचित वाकून सलामी देत, पण हळूहळू त्यात बदल होत गेला. तिन्ही सैन्यदलांची स्वतःची अशी विशेष पद्धत आहे व त्या वेगवेगळ्या पद्धतींमागे काही विशिष्ट अशी कारणं आहेत. तर चला मग, वेळ वाया न घालता जाणून घेऊयात, काय आहेत सॅल्यूट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीं मागची कारणं.
भुदल सेना (Indian Army) : जमीन, बॉर्डर, लाइन ऑफ कंट्रोल इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही इंडियन आर्मीच्या सलामी देण्याच्या विशिष्ट पद्धतीचे निरीक्षण कदाचित केले असेल, उजवा हात माथ्याला, पंजे खुले व हाताची सर्व बोटं समोरच्याला स्पष्ट दिसतील अशी. म्हणजेच आपल्या वरिष्ठाला अथवा तिरंग्याला अथवा कुठल्याही सन्माननीय आथितीस सलामी देताना त्या व्यक्तीस सलामी देणार्या जवानाचे पंजे स्पष्ट दिसू शकतील अशी सलामी देण्याची पद्धत इंडियन आर्मीची आहे व त्यामागे काही तर्क, संकेत, अर्थ दडलेले आहेत.
खुले पंजे व तेही समोरच्यास दिसतील असे, याचा अर्थ “माझ्या हातात कोणतेही शस्त्र नाही, तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता तसेच माझाही तुमचावर पूर्ण विश्वास आहे” असे या सलामी देणार्या जवानास सुचवायचे असते. तसेच, ही सलामी देण्याची पद्धत यासाठी की सैन्य दलाची रचना ही एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते म्हणजेच सामान्य सैनिक ते फील्ड मार्शल अशी ही चढत्या क्रमाने केलेली रचना ज्यामध्ये आपल्या वरिष्ठप्रती आदर व सम्मान दर्शवण्यासाठी अशाप्रकारे सल्युट करण्याची पद्धत आहे. आपापसातील आदर व विश्वास दर्शविण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे सलामी देण्याची पद्धत इंडियन आर्मी मध्ये वापरली जाते.
भारतीय वायुदल (Indian Air Force) : वरवर पाहता इंडियन एयर फोर्स आणि इंडियन आर्मी दोघांची सॅल्यूट करण्याची पद्धत तुम्हाला सारखीच वाटेल, पण असं नाहीये. इंडियन आर्मीचा सल्युट उजव्या हाताचा पंजा स्पष्टपणे तुम्हाला दिसेल असा असतो पण भारतीय वायुदलातील सैनिक अशाप्रकारे सल्युट करतात की हाताच्या पंजाचा जमिनीशी 45° चा कोन साधला जावा. असा सॅल्यूट, अशी सलामी म्हणजे एयर फोर्सच्या वाढत्या सामर्थ्याचे हे सूचक आहे. 2006 पूर्वी भारतीय वायुदलाची सलामी देण्याची पद्धत ही भारतीय भूदलासारखीच होती पण 2006 नंतर त्यात काही बदल करून नवी नियमावली तयार केली गेली व आपण पहाल तर आपणास असे जाणवेल की इंडियन एयर फोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत म्हणजे आर्मी व नेव्ही यांच्या सल्युट करण्याचा पद्धतीमधील मध्यच आहे.
भारतीय जलसेना (Indian Navy) : भारतीय जलसेनेची सलामी देण्याची पद्धत ही इतर दोन दलांपेक्षा वेगळीच म्हणजे उजव्या हाताचा पंजा पुर्णपणे जमिनीकडे झुकलेला जेणेकरून हाताचा जमिनीशी 90° चा कोन साधला जाईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नौदल सैनिक असा हाताचा पंजा करून सलामी का बरे देत असतील. तर याचही एक कारण आहे, पूर्वी किंवा क्वचित प्रसंगी आत्ताही जेव्हा नाविक व सैनिकांचे हात जहाजाची दुरूस्ती व देखभाल करताना ऑइल व ग्रीस यांनी माखले जायचे, त्यामुळे आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यास सलामी देताना त्या अधिकार्याचा अवमान होऊ नये हा त्यामागचा हेतु आहे असे म्हटले जाते.
भारतीय सेनेची प्रत्येक कृती, त्यांचासाठी घालून देण्यात आलेले नियम व त्यामागचा अर्थ आपल्याला समजणे जरा कठीणच. पण जेव्हा तुम्ही तो समजून घ्याल तेव्हा तुम्हाला निश्चित वाटेल की सैनिक बनणे म्हणजे सोपे काम नव्हे. कारण सैनिकांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत बंधनकारक असते व त्यात कसूर झाली तर सैनिकाला शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागते. सैन्यातील शिस्तभंगाची कारवाई इतकी कठोर असते की कुणालाही त्या शिक्षेस सामोरे जाणे अत्यंत कठीण वाटेल.
तुम्ही हा लेख वाचत असाल किंवा वाचला असेल तर पुढील वेळी जेव्हा कधी तुम्हाला भारतीय सैन्यातील कुठल्याही दलाचा सैनिक सलामी देताना दिसला तर एकदा बारकाईने त्याच्या सलामी देण्याचा पद्धतीकडे पहा तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की त्या सलामीचा अर्थ काय आहेत. ज्यांना असं वाटतं की सैन्याचे सॅल्यूट करणे म्हणजे केवळ एक पद्धत आहे तर हा लेख तुमचा गैरसमज नक्कीच दूर करेल.
Source: https://www.myinfobuzz.in/informative-marathi-articles/why-saluting-style-of-3-indian-forces-is-different/?utm_source=MarathiStatus2&fbclid=IwAR2B-i8-3xwi_p8Tf43-CK_-4hSZRLchI7aGh1mY1djgUG-or2Cl3ZHVIjE
No comments:
Post a Comment
Thanks you