खेळाडू ते क्रीडामंत्री, प्रत्येकाने वाचावा असा राज्यवर्धनसिंग राठौर यांचा प्रेरणादायी प्रवास
एक खेळाडू जेव्हा क्रीडामंत्री होतो तेव्हा देश खेळात कशी प्रगती करतो हे तुम्हाला पूर्ण लेख वाचल्यानंतर कळेलच
आपल्या देशाचा आरोग्यमंत्री डॉक्टर असेल, अर्थमंत्री एक अर्थतज्ञ असेल, क्रीडामंत्री एक खेळाडू असेल तर ? साहजिकच आपल्या देशाचा विकास, प्रगती अधिक वेगाने होईल आणि तसेच होताना दिसत आहे ते भारतीय क्रीडा क्षेत्राच्या बाबत. राजस्थानातील एक भाजपचा खासदार ज्याने सैन्यदलामध्ये राहून आपल्या देशाची अनेक वर्षे सेवा केली, एवढेच नव्हे तर, ज्याने सुमारे २५ पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय पदकं भारताला जिंकून दिली ज्यात अतिप्रतिष्ठित अशा ऑलम्पिक स्पर्धेतील रौप्य पदकाचा आणि कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदकाचाही समावेश आहे.
सैन्यात असतांना शत्रूचा आपल्या गोळीने अचूक वेध घेणारा आणि शूटिंग रेंजवर आपल्या टारगेटला कधीही मिस न करणाऱ्या कर्नल राज्यवर्धनसिंग राठोर ह्यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत हे तुम्ही ओळखले असेलच. सैनिकी शिस्त आणि कठोर परिश्रम ह्याचा वारसा त्यांना घरातूनच, आपल्या वडिलांकडूनच मिळाला, कारण राज्यवर्धन ह्यांचे वडीलसुद्धा सैन्यदलातच होते. जैसलमेरच्या राजपुताना घराण्यात जन्माला आलेले राज्यवर्धन राठोर “इंडियन आर्मी” जॉईन करण्यासाठी व एक यशस्वी खेळाडू बनण्यासाठीच जन्माला आले होते असेच वाटत राहते कारण त्यांचे व्यक्तिमत्व सैन्य व खेळाडू ह्यांना साजेसेच आहे.
६ फूट उंची, एका सैनिकाची असलेली अशी धारदार नजर ह्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच भारदस्त वाटते.
कर्नल पदावर असताना सैन्यातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी एका नव्या इनिंगला सुरुवात केली. नरेंद्र मोदी ह्यांच्या विचाराने प्रभावित होऊन ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले आणि राजस्थानच्या जयपूर ग्रामीण क्षेत्रातून भाजपचे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले.
मंत्रिमंडळात त्यांना वेगवेगळ्या खात्याचा कार्यभार मिळाला पण, एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी छाप पाडली ती क्रीडा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर. “एक खिलाडी का दर्द दुसरा खिलाडीही समज सकता है” हे हिंदीतील वाक्य राज्यवर्धन ह्यांना बरोबर लागू होते. ज्या देशात क्रिकेटशिवाय इतर खेळ नगण्य समजले जातात तिथे, अन्य खेळांचा विकास व त्या खेळांसाठी पायाभूत सुविधा व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे ह्यासारखी आव्हानात्मक बाब राज्यवर्धन राठोड ह्यांनी पार पाडली. केंद्रीय क्रीडामंत्रीपदाचा कार्यभार हाती घेणारी व्यक्ती एक “स्पोर्ट्समन” आहे हि भारतीय राजकारणातील एक दुर्मिळ घटनाच असेल.
क्रीडामंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राज्यवर्धन राठोड ह्यांनी एका क्रीडापटूला शोभेल असेच पाऊल उचलले ज्याचे नाव आहे “खेलो इंडिया”. भारताला क्रीडाजगतातील महासत्ता बनविण्यासाठी, ऑलिम्पिक पदक तालिकेत भारताचा क्रमांक अव्व्ल राहावा ह्यासाठी आणि भारतातील प्रत्येक युवा व बालक ह्यांनी जास्तीतजास्त खेळावे व आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा ह्यासाठी राठोर ह्यांनी हि महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली ज्याचे उत्तम परिणाम भविष्यात आपल्याला पहायला मिळतील ह्यात शंका नाही. “खेलो इंडिया” ची घोषणा केल्यानंतर ४७ वर्षीय कर्नल ह्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले होते ज्यावरून तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल कि देशाचा क्रीडामंत्री हा एक खेळाडू “का”असावा.
राज्यवर्धन राठोड म्हणतात कि एक खेळाडू बनण्यासाठी कोणकोणत्या अडचणींमधून जावे लागते ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. चुकीची निवडप्रक्रिया, मूलभूत सोयीसुविधा आणि खेळाडूच्या आई वडिलांची प्रयोजकाच्या शोधामुळे होणारी दमछाक ह्या सर्व अडचणीची मला पूर्ण कल्पना आहे व ह्याचसाठी खेलो इंडिया ही मोहीम राबवण्याचे निश्चित झाले आहे. हि काही हजार रुपयांची शिष्यवृत्ती नसून अखंड चालणारी प्रक्रिया आहे ज्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
ह्या त्यांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष हे करून दाखवले. खेलो इंडियाच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ दिल्ली येथे केल्यानंतर दुसरी आवृत्ती पुण्यात पार पडली. “खेलो इंडिया युथ” ह्या नावाने पार पडलेल्या ह्या सोहळ्याचे भव्य आयोजन, सर्वच क्रीडाप्रकारातील खेळाडूंना मिळालेल्या उत्तम सोयीसुविधा ह्यामुळे ह्या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू प्रचंड उत्साही व आनंदी दिसत होते आणि ह्याचे सर्व श्रेय एक क्रीडा मंत्री म्हणून राज्यवर्धन राठोड ह्यांना द्यावेच लागेल. मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन कसे करावे ह्याचा एक नमुना म्हणजे खेलो इंडिया युथचे पुणे येथे केलेले आयोजन.
२०१८ साली इंडोनेशिया इथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले. राज्यवर्धन राठोड आधी खेळाडू आहेत व नंतर एक क्रीडामंत्री आहेत, त्यामुळे कोणत्याही स्पर्धेआधी खेळाडूची मनस्थिती काय असते ह्याची पूर्ण कल्पना राठोर ह्यांना होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या खेळाडूंना “मोटिवेट” करण्याची, त्यांना प्रोत्साहित करण्याची पुरेपूर काळजी घेतली. ह्या आशियाई स्पर्धेमध्ये त्यांनी खेळाडूंना स्वतःच्या हातांनी स्नॅक्स सर्व्ह केले. त्यांची हि छोटीशी कृती आपल्या खेळाडूंचे मनोबल उंचावणारी ठरलीच पण त्याचबरोबर जनसामान्यांमध्ये त्यांच्याविषयीचा आदर अजूनच वाढला.
ह्या कर्तृत्ववान खेळाडूची, एका शूरवीर सैनिकाची, आणि त्यांच्या कार्यक्षमतेची आणि क्रीडाक्षेत्राच्या उन्नतीची तळमळ आपण “खेलो इंडिया” ह्यातून अनुभवली. आपण थोडक्यात पाहू कि राज्यवर्धन राठोर ह्यांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा गौरव सैन्यात, क्रीडा जगतात कशा प्रकारे झाला व त्यांना कोणकोणते सम्मान प्राप्त झाले.
1. २००५ साली “पद्मश्री” पुरस्काराने सम्मानित.
2. २००४-२००५ चा “राजीव गांधी खेलरत्न” पुरस्काराने सम्मानित.
3. २००३-२००४ साली “अर्जुन पुरस्कार” ने सम्मानित.
4. सैन्यातील योगदानाबद्दल राष्ट्रपतींकडून “अतिविशिष्ट सेवा पदक” ने सम्मानित.
5. २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वज वहन करण्याचा सम्मान राज्यवर्धन राठोड ह्यांना देण्यात आला.
“हमेशा आगे बढो” हे ज्यांचे आदर्श वाक्य आहे अशा कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड ह्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा व भारताला ऑलिम्पिकमध्ये अव्वल क्रमांक मिळवून देण्यासाठीच्या त्यांचा प्रयत्नांना उज्वल यश मिळो हीच सदिच्छा !
No comments:
Post a Comment
Thanks you